Friday, October 18, 2013

घरांची मागणी वाढता वाढता वाढे

देशातील सर्वाधिक मोठ्या आठ शहरांमध्ये दिवसागणिक घरांची मागणी वाढतेय. येत्या पाच वर्षांत सुमारे 1 कोटी 20 लाख घरांची गरज असल्याचे कॅशमन अँड वेकफील्डच्या ताज्या अहवालात सांगण्यात आले आहे. मागणी असलेल्या आठ शहरांमध्ये पुणे शहराचाही समावेश आहे. ही घरांची मागणी वाढतच असली तरी घरखरेदी सोपी आहे काय, या मुख्य प्रश्‍नाचे उत्तर सध्या तरी अनुत्तरित आहे. या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी पर्याय निर्माण करणे आवश्‍यक आहे.

महात्मा गांधीजींनी हाक दिली होती- खेड्याकडे चला. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात झाले नेमके उलटे. रोजगार, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा या इतर क्षेत्रांतील सोयी आणि संधी मिळविण्यासाठी नागरिकांचे स्थलांतर होत गेले आणि शहरीकरण वाढत गेले. सारे काही होऊ शकले, पण हे शहरीकरण आपण थांबवू शकलो नाही. या वाढत्या शहरीकरणाने जशा सोयीसुविधा आणि संधी दिल्या त्याच प्रकारे अनेक प्रश्‍नही निर्माण केले आहेत. शेती, स्वयंरोजगार करणारी व स्वत:च्या पायावर उभी राहिलेली काही टक्के मंडळी सोडली तर बहुतांश तरुणांची झेप शहराकडे असलेली दिसते, आणि यातच प्रगती असल्याचे व्यवस्था मानते. ग्रामीण भागातील तरुणांचे लोंढे शहराकडेच येताना दिसतात. या सर्वाचा परिणाम म्हणून पर्यायाने वाढत जाणारे शहरीकरण आलेच.

शहरीकरणाची देशातील स्थिती
2020 मध्ये देशाची शहरीकरणाची टक्केवारी 66 टक्‍क्‍यांच्या वाढीसह 40 टक्के इतकी असेल, तर महाराष्ट्राची 50 टक्‍क्‍यांच्या वाढीसह सध्याच्या 42 टक्‍क्‍यांवरून 60 टक्के इतकी असेल, असा अंदाज आहे. एवढा मोठा लोंढा शहराकडे येऊ पाहतोय. त्यातील नव्वद टक्‍क्‍यांहून अधिक निम्न व निम्न मध्यमवर्गीय गटातील असणार आहेत. एकदा स्थलांतर शहरात झाल्यानंतर त्यांच्याकडे घर असणे अपेक्षित आहे. केंद्रीय नियोजन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहरीकरणाचा हा बोजा देशभरातील केवळ ऐंशी शहरांवरच पडताना दिसतो आहे. त्यातील शहरीकरणाचा वेग सर्वाधिक असलेल्या सात शहरांवर तो अधिक असेल आणि त्यात पुणे शहराचा समावेश आहे, तर इतर महत्त्वाच्या बारा शहरांमध्ये पुणे, मुंबई वगळता केवळ नाशिकचा समावेश आहे. त्या सात शहरांत मग पुढचा प्रश्‍न निर्माण होतो, की या सर्व स्थलांतरितांचे लोढे शहरीकरणाच्या लाटेत किती समाधानी आहेत.

घरांची वाढती गरज
अन्न, वस्त्र, निवाऱ्यांची त्यांची मूलभूत गरज पूर्ण होते काय, हा अनुरुत्तरित राहणारा प्रश्‍न आहे. याच परिस्थितीचा परिणाम म्हणून घरांची गरज वाढताना दिसते आहे. कॅशमन अँड वेकफील्ड या मालमत्ता क्षेत्रातील संशोधन व सल्लागार संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात येत्या पाच म्हणजे 2013 ते 2017 या वर्षांत देशात सुमारे 1 कोटी 20 लाख घरांची गरज असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. त्यातील 23 टक्के मागणी ही दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, हैदराबाद, चेन्नई, बंगळूर, पुणे आणि अहमदाबाद या शहरांमध्ये मुख्यत्वेकरून असणार आहे. देशातील व एकूणच वरील मागणी असलेल्या शहरांमधील दर वर्षी लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणावरून ही गरज नोंदली गेलेली आहे. वरील आठ शहरांमधील मागणी ही मुख्यत्वेकरून उच्च आणि मध्यम वर्गातील लोकांच्या घरांसाठीची आहे आणि त्याची संख्या सुमारे पंचवीस लाख इतकी आहे, तर एकदम निम्न वर्गातील गरज लक्षात घेता ही संख्या 3 लाख इतकी असल्याचे अहवालात म्हटले आहे. निम्न गटातील घरांची गरज इतकी कमी कशी, असा प्रश्‍न निर्माण होणे साहजिकच आहे. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात जीवनशैलीत होणारी सुधारणा लक्षात घेऊन हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वरील आठ शहरांत येत्या पाच वर्षांत उच्च व मध्यम वर्गातील लोकांसाठी सुमारे चौदा लाख घरांची गरज भासणार आहे. त्यातील मध्यमवर्गातील घरांसाठी दहा लाख, तर उच्च वर्गातील लोकांसाठी चार लाखांची गरज असेल. मात्र सध्या ज्या गतीने घरांची मागणी आणि पुरवठ्याचे गणित सुरू आहे त्या गतीने जर हा पुरवठा होत गेला तर येत्या पाच वर्षांमध्ये वरील आठ शहरांमध्ये मागणी आणि पुरवठ्यातील तफावत ही 45 टक्के असेल, असा तर्कदेखील अहवालात नोंदविण्यात आलेला आहे.

अडचणी स्वप्नपूर्तीतील...
प्रस्तावित रिअल इस्टेट बिल 2013, जमीन ताबा कायदा 2013 आदी विविध कायदे आणि राजकीय स्थिती यांच्यामुळे या घरांच्या उपलब्धतेतील अडचणी वाढतील, अशी भीती कॅशमन अँड वेकफील्डच्या दक्षिण आशियाई विभागाचे व्यवस्थापकीय संचालक संजय दत्त यांनी या अहवालात व्यक्त केली आहे. तसेच सध्याच्या तयार असलेल्या घरांमुळे येत्या काही वर्षांमध्ये मागणी आणि पुरवठ्यातील तफावत आवाक्‍यात आलेली दिसेल, असेही त्यांनी त्यात म्हटले आहे. ही गोष्ट काही अंशी खरी ठरू शकते. ग्राहकहिताला प्राधान्य देण्याची गोष्ट आवश्‍यकच आहे, मात्र जर कायद्याचा कचाटा वाढला तर साऱ्याच बाजूंनी घेरले गेलेले बांधकाम क्षेत्र घरांच्या किमतीसारख्या ग्राहकांच्या महत्त्वाच्या मुद्‌द्‌यावर लक्ष केंद्रित करणारच.

वर उल्लेख केल्याप्रमाणे ही सारी परिस्थिती भविष्यातील अर्थव्यवस्थेची स्थिती, राजकीय इच्छाशक्ती, घरांच्या आवाक्‍यातील किमती, घरखरेदीदारांना बॅंकांचे मिळणारे पाठबळ यावरदेखील अवलंबून असणार आहे.

Saturday, October 12, 2013

ताबा सकारात्मक निष्कर्षांचा

पुणेकर घरखरेदीदारांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि इथल्या घरबांधणी क्षेत्राला उभारी देणारा सकारात्मक निष्कर्ष असलेला अभ्यास समोर आला आहे. बांधकाम व पायाभूत सुविधा संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या जोन्स लॅंग लासले इंडिया (जेएलएल) या सल्लागार संस्थेने सादर केलेल्या अभ्यासात कमिटमेंट दिल्या गेलेल्या तारखांच्या आसपास घराचा ताबा दिला जाण्याचे प्रमाण पुणे शहरात सर्वोत्तम असल्याचे समोर आले आहे.

सर्वसाधारपणे भाड्याच्या घरात राहायचे आणि नव्या घराचा ताबा मिळविण्यासाठी बांधकाम कंपन्यांचे उंबरठे झिजविणाऱ्या अनेक घरखरेदीदारांची परिस्थिती आपण पाहतो. काही अंशी कमी- अधिक प्रमाणात आपणदेखील त्याच परिस्थितीचा सामना केलेला असतो. अशात या अभ्यास अहवालाचे निष्कर्ष समोर आलेले पाहता, सामान्य घरखरेदीदाराने वेगळी प्रतिक्रिया व्यक्त करणे साहाजिक आहे. मात्र या नव्या अभ्यासातून मात्र वेगळी सत्यस्थिती समोर आलेली दिसते आहे.

एकूणच मंदीच्या काळात पुणे स्थित घरबांधणी उद्योग तुलनेने चांगली कामगिरी बजाविताना दिसतो आहे, हे मागील काही दिवसांपासून समोर आलेल्या विविध अहवालांवरून स्पष्ट होताना दिसते आहे. अशा आर्थिक पेचप्रसंगातही 2013 या चालू वर्षात विविध बांधकाम कंपनींनी घराचा ताबा देण्याचे मान्य केलेल्या एकूण सदनिकांच्या चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक सदनिकांचा ताबा ग्राहकास दिला गेल्याचे अहवालात स्पष्ट केले गेले आहे. ही आकडेवारी देशात सर्वाधिक चांगली कामगिरी म्हणून गणली जाते आहे. जेएलएलने नुकत्याच सादर केलेल्या अभ्यास अहवालात सर्वांधिक संख्येने सदनिकांचे ताबे पुणे शहरात दिले गेले असल्याचे सांगितले आहे.

परिणाम थेट स्वप्नपूर्तीवरच :
जागतिक आणि देशी आर्थिक परिस्थितीचा विचार करता त्याच्या परिणामांपासून बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्र वेगळा राहू शकलेला नाही. देशातील विविध शहरांतील बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्र याची झळ सोसताना दिसत आहेत. साहजिकच याचा परिणाम सामान्य घरखरेदीदारांच्या स्वप्नपूर्तेवर होताना दिसतो आहे. या परिस्थितीने घरखरेदीदार आणि बांधकाम विकसकांची आर्थिक गणिते ताणली गेल्याने त्याचा एकूणच परिणाम घराचा ताबा देण्यावर झाला. यामुळे देशभर बांधकाम क्षेत्राला ग्राहकांच्या नाराजीचा सामना करावा लागताना दिसतो आहे.

देशात एकूण 2013 या चालू वर्षात ताबा देण्याचे वचन (कमिटमेंट) दिल्या गेलेल्या 25 टक्‍क्‍यांहून अधिक घरांचा ताबा देण्यास उशीर होत असल्याची नोंद झाली आहे. विशेष करून उत्तर भारतातील (दिल्ली, गुडगाव आदी) प्रकल्पांना आगामी काळात ही परिस्थिती थोड्या प्रमाणात अधिक गंभीर होताना दिसेल. अशी भीती अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

पश्‍चिम भारतात चांगली स्थिती
उत्तर भारतात चिंता निर्माण करणारी परिस्थिती निर्माण होत असली तरी पश्‍चिम भारतात त्यातही विशेष करून मुंबई आणि पुणे शहरांविषयी अधिक चिंता करण्याचे कारण नाही, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये नियोजित वेळेत घरांचे ताबे दिले जातील, असा अंदाज यात व्यक्त करण्यात आला आहे. या दोन्ही शहरांमध्ये 2013 या चालू वर्षात विविध बांधकाम कंपन्यांनी घराचा ताबा देण्याचे मान्य केलेल्या एकूण सदनिकांच्या चाळीस टक्‍क्‍याहूंन अधिक सदनिकांचा ताबा दिला गेल्याचे अहवालात स्पष्ट केले गेले आहे.

मात्र पुणे शहराचा विचार करता आवाक्‍यातील घरांचे गृहप्रकल्प लक्षणीय संख्येने सादर होताना दिसत आहेत. त्यातच या प्रकल्पांना मिळणारा प्रतिसाददेखील दखल घेण्याजोगा आहे. या प्रकल्पात सादर होणाऱ्या सदनिकांचा विचार केला तर घर आणि खर्च या दोन्ही गोष्टी आवाक्‍यातील असतील तर त्या प्रकल्पांना नोंदणीचा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. आवाक्‍यातील घरांची गरज बांधकाम व्यावसायिकांनीदेखील ओळखलेली दिसते आहे. ही गरज अशीच पूर्ण होत राहिल्यास पुणे शहराची स्थिती निश्‍चितच देशातील इतर शहरांपेक्षा वेगळीच असलेली दिसेल.

ताबा मिळण्यास उशीर कशामुळे ?
जेएलएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार या अभ्यास व निष्कर्षांसंबंधाने मत व्यक्त करताना सांगतात, की सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती, महागाई, बांधकाम मंजुरी प्रक्रिया शुल्क व त्यास लागणारा उशीर, बांधकाम खर्च, त्यासाठी आवश्‍यक असलेल्या निधीच्या टंचाईने ही परिस्थिती ओढावली आहे. या व इतर गोष्टीदेखील या क्षेत्रावर परिणाम करताना दिसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आगामी रिअल इस्टेट रेग्युलेटरी बिल, जमीन ताबा विधेयक आणि इतर नव्या कायद्यामुळे ही परिस्थिती काही प्रमाणात होऊ शकते, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत ग्राहकांनीदेखील काहीशी काळजी घेणे गरजेचे आहे. अशा स्थितीत घर खरेदी करताना चांगली कामगिरी असलेल्या, नोंदणीकृत बांधकाम व्यावसायिकाकडेच घर घेण्याचे, नोंदणी करण्याचे ठरविलेले सोयीचे होईल. सर्वसाधारणपणे या सणांच्या कालावधीत म्हणजेच नवरात्री, दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक जण घर खरेदी आणि घरांचा ताबा घेऊन राहायला जाण्यासाठी आग्रही असतात. कारण हा सणांचा काळ त्यांना संस्मरणीय करायचा असतो.

अशा स्थितीत घरखरेदीच्या निर्णयासाठी थांबून राहिलेला ग्राहक पुन्हा एकदा समोर येऊन, आहे त्या परिस्थितीचा सामना करून घरखरेदीचा निर्णय घेईल, त्यामुळे पुन्हा एकदा या क्षेत्रात हालचाल वेग घेताना दिसेल, अशी आशा आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. घरखरेदीच्या निर्णयाने केवळ बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रातील हालचालींना वेग येणार नाही, तर अर्थव्यवस्थेवरील मंदीचे मळभदेखील दूर होईल असा अंदाज बांधला जातो आहे.

Friday, October 4, 2013

सगळ्यात भारी आपले पुणे

सर्व महानगरांना अर्थव्यवस्थेवरील मरगळीची झळ बसताना दिसते आहे. गृहबांधणी क्षेत्रदेखील याला अपवाद ठरलेला दिसत नाही. अशा परिस्थितीत पुणे शहरात घरांची मागणी आणि पुरवठ्यामधील तफावत दिवसागणिक वाढतेच आहे. शहरातील बांधकाम क्षेत्रास ही झळ तुलनेने कमी बसताना दिसते आहे, असे म्हणणं आहे आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे. याला दुजोरा दिला आहे तो सीआयआयच्या परिसंवादातील तज्ज्ञांनी व पुणे आणि बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईने.

राष्ट्रीय पातळीवरील उद्योजकांची संघटना असलेल्या "सीआयआय' या संघटनेच्या पुणे शाखेतर्फे नुकत्याच एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बांधकाम व्यावसायिक, आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ, बांधकामांना विविध साहित्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी घरबांधणी क्षेत्राच्या सद्यःस्थितीबाबत आपली मते मांडली. याशिवाय आवाक्‍यातील घरांची गरज, टाऊनशिप आदी विषयांवर मते व अपेक्षा समोर मांडण्यात आली.

या परिसंवादात पुण्यात देशी आर्थिक परिस्थितीचा परिणाम कमी होताना दिसत असल्याची कारणमीमांसा स्पष्ट करण्याचा प्रयत्न झाला. ही कारणमीमांसा काही अंशी पटण्यासारखी आहे. या कारणांची यादी पाहिल्यास आपल्याही जाणवेल की, आवाक्‍यातील घरांची उपलब्धता करून दिल्यास पुण्यातील चोखंदळ ग्राहक त्याला प्रतिसाद देताना दिसतो. उर्वरित घरांची बाब आवाक्‍याबाहेरील आहे. ही बाजारपेठेची स्थिती बांधकाम व्यावसायिकांनी देखील लक्षात घेतलेली दिसत आहे. सादर होणाऱ्या गृहप्रकल्पांवरून याचा अंदाज आपणास येतो आहे.

पुणे उणे नाही अधिकच...
आपण या पुढे चर्चा करूयात ती परिसंवादात मांडण्यात आलेली आणि इतर कारणांचा. ज्यामुळे अशा आर्थिक परिस्थितीतही पुणे बांधकाम क्षेत्र वा पुणे बाजारपेठ तग धरून आहे. नॅशनल हाउसिंग बॅंक नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशातील 26 शहरांपैकी 22 शहरांमध्ये निवासी क्षेत्र कमी अधिक प्रमाणात बदलत्या आर्थिक व्यवस्थेशी दोन हात करताना दिसते आहे. या अर्थव्यवस्थेचा परिणाम त्या शहरातील बांधकाम क्षेत्रावर, घरांच्या विक्रीवर व किमतीवर झालेला आहे. मात्र, त्यातील एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे या अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक कमी फटका बसलेल्या चार शहरांमध्ये पुणे शहरांचा क्रमांक वरचा आहे. म्हणजेच पुण्यातील बांधकाम क्षेत्राला सर्वाधिक कमी फटका बसताना दिसतो आहे. आता आपण हा फटका कमी बसण्यामागील कारणांचा विचार करूयात.

ग्रोथ इंजिन्सना पर्याय
शहरातील अर्थव्यवस्थेच्या घडीचा विचार केला तर पुणे शहरातील आर्थिक उलाढालीचा, ग्रोथ इंजिन्सचा विचार केला तर, पुणे शहर कोणत्याही एका क्षेत्रावर अवलंबून नाही. केवळ शिक्षण नाही, केवळ रोजगार क्षेत्र नाही ना केवळ ऑटो उद्योग नाही. शिक्षण, ऑटो, आयटी, आयटीज, बीटी, रोजगाराची केंद्रे, ही पुण्याची ग्रोथ इंजिन्स आहेत. ही क्षेत्रे पुणे शहराची पुण्यातील आर्थिक घडी, तिची व्यवस्था अबाधित राखण्याचे कार्य करतात. शिक्षण व ऑटो प्रमुख दोन क्षेत्राचा विचार केला, तर पुणे शहरातच 26 अधिक खासगी व शासकीय विद्यापीठे आहेत. त्यामुळे देशी व परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही लाखांच्या घरात आहेत. इथे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेल्या संशोधन व प्रशिक्षण संस्था आहेत. ऑटो क्षेत्राची दखल घेतली तर सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाहन कंपन्यांची उत्पादन केंद्रे पुणे शहर परिसरात आहेत. त्यामुळे रोजगाराचा आणि त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची उपलब्धताही पुरेशा प्रमाणात असलेली दिसते. एवढेच नव्हे तर याच्या जोडीला वैद्यकीय पर्यटन, ऐतिहासिक ठिकाण, सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील पुणे शहर स्थलांतरासाठी प्राधान्यक्रमावर असते, ज्याची दखल आज घेतली जाते आहे. वरील सर्व कारणांमुळे स्थलांतरित नागरिकांचा ओघ सुरूच आहे. या स्थलांतरित नागरिकांची गरजच मागणी आणि पुरवठ्यात अंतर निर्माण करते. घरांच्या किमती आवाक्‍यात नाहीत ही बाब मान्य आहे. पण, घरांच्या किमती मागणी आणि पुरवठ्याच्या नियमांसोबत इतर कारणेही परिणाम करतात. याचाही विचार व्हायला हवा.

आयटी क्षेत्राची कामगिरी
देशी अर्थव्यवस्थेची कामगिरी दिवसागणिक खराब होत असली तरी जागतिक आर्थिक परिस्थिती मात्र काही अंशी सुधारताना दिसते आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील आयटी कंपन्यांना चांगल्या पद्धतीचे व लक्षणीय संख्येने प्रकल्प निर्यात करताना दिसत आहेत. म्हणजेच पुण्यातील आयटी कंपन्या व त्याच्या आर्थिक उलाढालीवर देशी अर्थव्यवस्थेचा म्हणावा तसा थेट परिणाम होताना दिसत नाही. आयटीमध्ये काम करणाऱ्या तरुणांना कमी वयात अधिक चांगले वेतन हाती येते. त्यामुळे या तरुणांचे करिअर इतर शहरातील तरुणांच्या तुलनेने या शहरातच अधिक लवकर सेट झालेले दिसते. त्यामुळे देखील याचा परिणाम घरांच्या मागणीवर होताना दिसतो. याशिवाय मुंबई शहराशी असलेली पुण्याची जवळिकता ही पुणे शहरासाठीचा सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. या भोगौलिक स्थितीचा आणि वेगवान अशा एक्‍स्प्रेस-वेचा खूप मोठा फायदा पुणे शहराला लाभला आहे.

विकास योजना मार्गी
विकास योजनाच्या मार्गावर पुणे शहराने घेतलेली आघाडी सुद्धा लक्षणीय अशी आहे. रिंगरोड, मेट्रो प्रकल्पाला राज्य शासनाने दिलेल्या मंजुरीने या विकास कामात मोलाची भर टाकलेली आहे. हे काही प्रकल्प प्राथमिक अवस्थेत असले तरी याचा फायदा शहर विस्तारासाठी व इथल्या भविष्यातील विकास नियोजनात होताना दिसणार आहे.

अपेक्षा विकासाच्या वाटेवरच्या
विकास योजनांच्या बाबतीत विचार करताना आणखी काही अपेक्षा आहेत. त्या मार्गी लागल्या तर या मंदीचा फारसा परिणाम होताना दिसणार नाही, असे बांधकाम व आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. ज्यामध्ये शहर विकास आराखडा, पीएमआरडीएची स्थापना, बांधकामांच्या मंजुरीकरिता प्रशासकीय पातळीवर एक खिडकी योजनेच्या रूपाने गतिमानता, वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा निघून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणे, शहराच्या हॉरिझॉंटल (आडव्या) विकासापेक्षा व्हर्टिकल (उभ्या) विकासासाठी प्रोत्साहन देणे या सर्व योजनांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न म्हणून पायाभूत सुविधांच्या विकासावर धोरणकर्त्यांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

शहर वाढीचा विचार केला तर यात जुन्या सोसायट्यांचा व पेठांमधील वाड्याच्या पुनर्विकासाचा मुद्दादेखील तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यांचा विचार करताना या इमारतींना अधिकचा एफएसआय, इमारतीत ग्राह्य धरली जाणारी पार्किंगची उंची या यासंबंधाने असलेल्या विविध मुद्यांचा सकारात्मक विचार करून धोरणकर्त्यांनी धोरणांची आखणी केल्यास ते शहर विकासाच्या हिताचे ठरले. अशी आग्रही मागणी परिसंवादही व्यक्त करण्यात आली.

येणाऱ्या सणांच्या काळात गृहबांधणी क्षेत्रावरील ही मरगळ काही अंशी काही होईना दूर होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. मात्र, त्यापेक्षाही ही मरगळ दूर होण्यासाठी घर आणि घरकर्ज या दोन्ही गोष्टी सामान्य ग्राहकांच्या आवाक्‍यात आल्या तर सध्याच्या आर्थिक परिस्थितीला चालना तर मिळेलच शिवाय सामान्य घरखरेदीराचे स्वप्न देखील पूर्ण होईल. हीच गोष्ट सणांचा आनंद द्विगुणित करणारी ठरेल.